जालना- शहर नगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विषयपत्रिकेवरील २२ विषयांना ११ मिनिटात मंजुरी देऊन सभा समाप्त करण्यात आली आहे. या सभेमध्ये प्रामु्ख्याने नगरपालिकेचे पाणी चोरणारे व नगरपालिकेची जलवाहिनी वारंवार फोडणाऱ्या जिओ या मोबाईल कंपनी विषयी चर्चा झाली आहे.
या सभेत मागील तीन महिन्यापासून जालन्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा च्या अनियमित्तेबाबत नगरसेवकांनी तक्रारी केल्या. तसेच त्यांनी जालन्यातील स्वच्छता, अतिक्रमणविषयी व आपापल्या प्रभागातील अडचणी नगराध्यक्षा समोर मांडल्या.
सभेदरम्यान जायकवाडी येथून जालन्यासाठी निघालेले पाणी रस्त्यामध्येच वॉल्व फोडून शेतकरी चोरून नेतात. या चोरांवर गुन्हे दाखल केले तरीदेखील त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे जालनेकरांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा, पाणीपुरवठा सभापती रमेश गोरक्षक यांनी सभेत मांडला. त्यावर मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी उत्तर देताना सांगितले की, हा चोरीचा विषय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या पर्यंत ते घेऊन गेले असून त्यांनी तहसीलदारांना आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात पाणी चोरीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, ते बंद झाले नाही. ते पूर्णपणे बंद करण्यासाठी देखील आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच जिओ ही मोबाईल कंपनी शहरामध्ये केबल टाकण्याच्या नावाखाली रस्ते फोडत आहे. आणि त्यामुळे गांधीचमन आणि लक्कडकोट अशा दोन ठिकाणी महत्त्वाच्या जलवाहिन्या फुटल्या आहेत. त्यामुळे नगरपालिकेचे तर नुकसान झालेच, शिवाय जनतेच्या रोषाला ही बळी पडावे लागले आहे. त्यामुळे या कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सभापतीसह नगरसेवकांनी सभेत लावून धरली होती.
याच सोबत इंदिरानगर भागातील खदान भरून सदर जागा नगरपालिकेकडे घेण्यासाठी प्रस्ताव तयार करणे, अमृत वन देखभाल दुरुस्तीसाठी एजन्सी नेमणे, शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविणे, जालना शहरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना मालमत्ता करात सूट देणे बाबत चर्चा करून निर्णय घेणे, आदि 22 विषयांना अवघ्या अकरा मिनिटातच चर्चा करून मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्ष सौ. संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वसाधारण सभेला उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याअधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह नगरपालिकेचे खातेप्रमुख उपस्थित होते.