जालना - नगरपालिकेत विविध विभागात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी होत होत्या. एन एच शिंदे यांनी यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशानुसार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती नेमून 26 जुलै रोजी ही चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र चौकशीच्या दोन दिवस आगोदरच जालना नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची बदली झाली. त्यामुळे ही चौकशी लांबणीवर पडली होती. ती आज(2 ऑगस्ट) पुन्हा चौकशीला सुरूवात झाली आहे. तक्रारकर्ते शिंदे हे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे भाचे आहेत.
औरंगाबाद विभागाचे अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती चौकशी करत आहे. या समितीमध्ये नगर पालिका प्रशासन विभागाच्या प्रादेशिक संचालिका पोलीसपोरे सहाय्यक संचालक ताळमेळचे वैजनाथ शेळके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता डी डी मालेवार, लेखाधिकारी संजय धीवर यांचा समावेश आहे.
आज सकाळी दहा वाजता ही समिती जालना नगरपालिकेत दाखल झाली. त्यानंतर दालन बंद करून सर्व सचिवांची झाडाझडती सुरू झाली. सर्व विभाग प्रमुखांना आरोपांविषयी जाब विचारण्यात येत आहे. दरम्यान ही चौकशी किती दिवस चालेल याविषयी मात्र अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.