जालना - जालना नगरपालिकेचा 2021- 22 साठीचा 399 कोटी 33 लाख 13 हजार पाचशे रुपयांच्या अर्थसंकल्प आज विशेष सभागृहात मांडण्यात आला. या अर्थसंकल्पाला बिनविरोध मंजुरीही देण्यात आली आहे.
जालन्याच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली आज अर्थसंकल्पीय विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, प्रशासकीय अधिकारी विजय फुलंब्रीकर यांची उपस्थिती होती. दरम्यान आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सण 2022 ला दोन लाख पाच हजार रुपये शिल्लक असणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाला सभागृहाने एकमताने आणि कुठल्याही मुद्द्यावर चर्चा न करता दहा मिनिटात मंजुरी दिली.
या सदस्यांचा शेवटचा अर्थसंकल्प-
आज सादर झालेला अर्थसंकल्प विद्यमान सदस्यांसाठी शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. कारण नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कुठलीही चर्चा न करता नगरसेवकांनी या कामांना एक मुखाने मंजुरी दिली आहे.
असा येईल पैसा-
- कर महसूल 68 कोटी दहा लाख 90 हजार.
- महसुली अनुदाने व अंशदाने 69 कोटी 39 लाख 78 हजार.
- नगरपालिका मालमत्ते पासून येणारे भाड्याचे उत्पन्न 8 कोटी 37 लाख 17 हजार 500.
- फी वापर करता व द्रव्य दंड 6 कोटी 31 लाख 88 हजार.
- विक्री व भाडे करार 11 लाख 5 हजार.
- व्याजा पासून मिळणारे उत्पन्न 2 कोटी 17 लाख 90 हजार. भांडवली जमा अनुदाने 244 कोटी 82 लाख 50 हजार.
- प्रारंभिक शिल्लक एक लाख 95 हजार.
अशा एकूण 399 कोटी 33 लाख 13 हजार 500 रुपयांची रक्कम जालना नगरपालिकेच्या तिजोरीत जमा होणे अपेक्षित आहे.
असा जाईल पैसा-
- आस्थापनेवरील खर्च 71 कोटी 63 लाख 64हजार.
- प्रशासकीय खर्च 18 कोटी 27 लाख 29 हजार.
- मालमत्तांची दुरुस्ती व परीक्षण 1 कोटी 30 लाख.
- व्यवहार व कार्यक्रमांसाठी अंमलबजावणीकरिता खरेदी 1 कोटी 20 लाख.
- राखीव निधी आणि संकीर्ण खर्च 9 कोटी 16 लाख.
- स्थिर व जंगम मालमत्ता 244 कोटी 87 लाख 51 हजार.
- प्रगतीपथावरील भांडवली कामे 42 कोटी 76 लाख 51 हजार. कर्ज आणि ठेवी 10 कोटी 10 लाख 13 हजार 500.
- सण 2022 अखेर शिल्लक 2 लाख 5 हजार .
अशा या जालना नगरपालिकेच्या 2021 -22 च्या 399 कोटी 33 लाख 13 हजार 500 रुपयाच्या अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली आहे.
हेही वाचा- होय, शरद पवार माझा बापच - चित्रा वाघ