जालना - स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांना संरक्षण देऊन, खंडणी बहाद्दरांना आळा घालावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. आज निषेध दिन म्हणून जिल्ह्यातील बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्यात आली होती.
इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठक
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज शहरातील डॉक्टरांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रुग्णालयांवर आणि डॉक्टरांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच रुग्णालयांवर होणारे हल्ले हे रुग्णांचे नातेवाईक करत नाहीत, तर गुंड लोक करतात, अशा खंडणीखोर लोकांना आळा घालावा, त्यांचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, त्यासोबत त्यांना झालेली शिक्षा ही प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून जाहीर करावी, जेणेकरून त्यापुढे असे वर्तन कोणी करणार नाही, अशी मागणी यावेळी डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली. या बैठकीला आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉक्टर अतुल जिंतुरकर, सचिव डॉक्टर सागर गंगवाल, यांच्यासह डॉक्टर श्रीमंत मिसाळ, डॉक्टर सुरेश साबू , डॉक्टर प्रकाश शिंगेदार, डॉक्टर ख्रिस्तोफर मोजस, डॉक्टर अनुराधा राख, डॉक्टर किशन खिल्लारी, डॉक्टर सचदेव आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - निर्माता रमेश तौरानी यांची फसवणूक, त्यांच्या ३५६ कर्मचाऱ्यांना दिले ‘फेक वॅक्सीन’?