जालना - जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हे जालना शहरातील आहेत. या रुग्णांच्या वाहतुकीसाठी शहरात फक्त दोनच रुग्णवाहिका आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आणखी 10 वाहने अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे रुग्णवाहिका दोन असल्याने कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी विलंब होत होता. त्यामुळे रुग्णाच्या परिसरात भीतीचे वातावरण आजवर दिसून आले आहे. रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. त्यामुळे साधारण एक तास प्रवासात, एक तास निर्जंतुकीकरणात आणि एक तास संबंधित रुग्णाच्या घरी असे सुमारे तीन रुग्णवाहिकेला लागत होते. तर नवीन 30 ते 40 कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दहा ट्रॅक्स वाहने अधिग्रहित केली आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना विलगीकरणापर्यंत नेऊन सोडण्यासाठी वेगळे वाहन आणि कोरोना बाधित रुग्ण आणण्यासाठी दोन रुग्णवाहिकांचा वापर होणार आहे.
भावनिक प्रश्न असल्यामुळे होतो विलंब
कोरोना बाधित रुग्णाला रुग्णवाहिकेतून आणण्यापूर्वी फोनवरून कळविले जाते. मात्र, रुग्णवाहिका पोहोचल्यानंतर रुग्णांचे नातेवाईक भावनिक होतात. त्यामुळे रुग्णाला घेवून जाण्यासाठी रुग्णवाहिकेला वेळ लागतो. रुग्णवाहिकेकडून दुसऱ्या रुग्णाला घरातून रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणखी विलंब लागतो.