जालना - कोरोनासाठी विशेष भरती केलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून थकले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावरच हे कर्मचारी निवेदनाचे कागद हातात घेऊन फिरत आहेत. दरम्यान, सोमवारपर्यंत या कर्मचाऱ्यांचे पगार होतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर यांनी दिली.
राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत कार्यरत आहेत हे कर्मचारी
जालना जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मिशन अंतर्गत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. सहा महिन्यांमध्ये दोन वेळा पगार थकल्यामुळे हे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. आता सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचा पगार झालेला नाही. त्यातच दिवाळी तोंडावर आल्यामुळे खर्चही वाढलेला आहे. म्हणून दोन्ही महिन्याचे पगार त्वरित करावेत, यासाठी हे कंत्राटी कर्मचारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद अशा तीन विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यासाठी फिरत आहेत.
सोमवारपर्यंत पगार होतील
कर्मचारी राष्ट्रीय मिशनअंतर्गत कार्यरत असले तरी प्रत्यक्षात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नियंत्रणात ते काम करीत आहेत. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पाटील यांनी हा चेंडू जिल्हा परिषदेकडे ढकलला आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर यांना विचारणा केली असता, ते म्हणाले आजच या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी बजेट मिळाले आहे. त्यामुळे उद्या किंवा परवा सप्टेंबरचा पगार त्यांना मिळेल आणि ऑक्टोबरच्या पगाराचे काम सुरू आहे ते देखील दोन दिवसात पूर्ण होऊन सोमवारी दुसऱ्या महिन्याचाही पगार त्यांना मिळेल.
दरम्यान, आज निवेदन देण्यासाठी आरोग्य कर्मचारी प्रतिभा वाहुळे, प्रियांका वाघमारे, आयेशा खान, रोहित पाखरे, प्रांजली पांण्डे, भगवान चास्ते, आम्रपाली शिंदे, आशा घोरपडे आदी कर्मचारी उपस्थित होते.