जालना - जालन्यापासून तीन किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळावर एका तरूण आणि तरूणीने आत्महत्या केली. सोमवारी रात्री सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
रात्री सात वाजेच्या सुमारास औरंगाबादहून जालन्याकडे येणाऱ्या मराठवाडा एक्सप्रेसखाली या दोघांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. आत्महत्या केल्यानंतर दोन्ही मृतदेह सुमारे शंभर मीटर फरफटत आले. त्यामुळे मृतदेहाची अवस्था विचित्र झाली होती. मृतदेहाजवळ सापडलेल्या एका बॅगमध्ये मुलीचे महाविद्यालयीन ओळख पत्र सापडले आहे. या ओळख पत्रानुसार मुलीचे नाव शितल शरद कान्हे (वय 18 वर्ष,रा.अंबड) आहे. त्यासोबत तरूण तुषार प्रेमानंद रगडे (वय 19) याचाही मृतदेह सापडला आहे. रात्री उशीरा हे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले .
पोलीस यंत्रणा हतबल -
रात्री अंधारामध्ये ही घटना घडल्यामुळे मृतांची ओळख पटवणे कठीण झाले होते. मृतदेहांची छिन्नविछन्न अवस्थापाहून नागरिक देखील मृतदेहाजवळ जाण्यास भीत होते. त्यामुळे त्यांची ओळख पटवायची कशी? हा मोठा प्रश्न चंदनजिरा पोलिसांसमोर होता. बराच वेळानंतर शासकीय मदत मागवून त्यांनी हा प्रश्न सोडवला.