जालना - जालना आणि औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आज पार पडली. जालन्याच्या तहसील कार्यालयात आज सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीचे अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने बाबुराव कुलकर्णी या दोघांमध्येच खरी लढत होती.
सकाळी दहा पर्यंत एकाही सदस्याने मतदानासाठी हजेरी लावली नव्हती. मात्र, त्यानंतर जालन्याच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ३९ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर, जालना जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यासह भाजप शिवसेनेच्या सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
जालना तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रात, केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार दिलीप शेनफड सोनवणे उपस्थित होते. तर, क्षेत्रीय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार रमेश पोलास यांच्यासह अतुल केदार, संजय तेजनकर, सचिन पगारे हे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.