जालना - भोकरदन रस्त्यावरील आडव्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाजवळ सर्व्हे नंबर 147 मध्ये आज मंगळवारी पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करण्यात आली. जालना-भोकरदन रस्ता हा चुकीच्या सर्व्हे नंबरमध्ये दाखविण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज ही मोजणी झाली. समृद्धी महामार्गाला खेटून असलेल्या जागेसंदर्भात देखील वाद सुरू आहे, पार्श्वभूमीवर देखील ही मोजणी झाली.
जालना-भोकरदन हा रस्ता सर्व्हे नंबर 147 मध्ये दाखवणे अपेक्षित असताना तो सर्व्हे नंबर 148 मध्ये दाखविण्यात आला आहे. ही कार्यालयीन त्रुटी असून लवकरच दूर होईल, अशी माहिती जालन्याचे उपाधिक्षक भुमी अभिलेख समीर दांणेकर यांनी दिली. या सोबतच समृद्धी महामार्ग ज्या जागेतून जात आहे त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागेसदर्भात देखील किरकोळ वाद सुरू आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये आज ही मोजणी करण्यात आली.
समृद्धीमहामार्गाच्या बाजूला जी जागा आहे, या जागेसंदर्भात नवीन भुरेवाल, कचरूलाल भुरेवाल तसेच मनोज जिंदल, अरुण अग्रवाल यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. त्यामुळे या जागेची पोलीस बंदोबस्तात मोजणी करून हा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल आणि त्यानंतरच निर्णय होईल, असेही समीर दांणेकर म्हणाले. या मोजणीचे वेळी चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे सतीश फोलाने, विठ्ठल राऊत, राजेश जाधव, आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.