जालना- प्राप्तिकर विभागाकडून छापासत्र टाकताना अत्यंत गोपनीयता बाळगण्यात येते. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वाहनांना विवाहाचे बॅनर वाहनांवर लावून छापासत्र सुरू केले. त्यांनी आपल्या वाहनांवर राहुल अंजली वेड्स ( Rahul weds Anjali ) असे स्टिकर लावल्याचे दिसून आले.
जालन्यात सलग तिसऱ्या दिवशी छापासत्र सुरू ( IT raids on steel businessman ) राहिले. स्टील उद्योजकांच्या घरासह कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकून महत्वाचे कागदपत्रे जप्त केली आहेत. शहरातील कापड , इलेक्ट्रॉनिक्स सामानाच्या दुकानांवर शहरातील काही बँकेवर प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्य आहेत. जिंदल मार्केटमध्येदेखील ( Jindal market Jalna ) काही दुकानांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी जप्त केली कागदपत्रे- दुकानांमधून प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु अधिकारी स्तरावर कोणतीही अजून माहिती दिलेली नाही. या कार्यवाहीत मोठ्या प्रमाणात अधिकारी आसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारवाईत जालना औरंगाबाद येथील प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
छाप्यात 390 कोटींची मालमत्ता जप्त-प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छापेमारीत 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोने अशी एकूण 390 कोटींची बहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागली आहे. आयकर विभागाच्या 300 अधिकाऱ्यांनी जालन्यातील स्टील उद्योग आणि बांधकाम व्यावसायिकांच्या मालमत्तेवर 5 दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यानी स्टील उद्योजकांच्या कंपन्यांसह घरावर छापे टाकले होते. या छापेमारीतच काही दस्तावेज 32 किलो सोने, 58 कोटी रुपयांची रोख रक्कम अशी एकूण 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.