जालना - कापसावरील बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाईपोटी अनुदान देण्यात आले. या अनुदानाच्या वाटपात अनियमितता करणाऱ्या तलाठ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सन 2017-18 मध्ये शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या अनुदानात अनियमितता केल्याचा ठपका ठेवून उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी जालना तालुक्यातील आठ तलाठ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा... मुख्यंत्र्यांनी 'नाणार'वर बोलणं टाळलं, शिवसेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी लकडे यांनी दिनांक 22 मे 2019 रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना अर्ज देऊन संबंधित तलाठ्यांच्या गैर कारभाराबाबत तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी जालना तहसीलदारांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीचा अहवाल दिनांक 11 फेब्रुवारी 20 रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. अहवालावरून 8 तलाठ्यांनी अनुदान वाटपात गंभीर स्वरूपाची अनियमितता केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असे तहसीलदारांनी म्हटले आहे.
हेही वाचा... साखर कारखान्यांसाठी 'सुगीचा हंगाम', चढे दर असताना निर्यातीची संधी
श्रीमती एस .जी. राठोड (मौजे साळेगाव नेर) पि. डी. हजारे (घोडेगाव) एस. आर. जाधव (मोतीगव्हाण) श्रीमती पी. एच. अलकटवार (टाकरवन) पी. डी. रुईकर (मौजे नागापूर) व्ही. बी. कणके (जामवाडी) श्रीमती एम. एस. देशमुख (थेरगाव) एन. जे. दहिवाळ (पळसखेडा) अशी या आठ तलाठ्यांची नावे आहेत.
तलाठ्यांनी त्यांना दिलेल्या संबंधित गावांमध्ये अनुदान वाटपात गैरव्यवहार केल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांच्या 'सजा'चे नाव वेगवेगळे आहे. या आठ तलाठ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी काढले.