जालना - मुंबईच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करणाऱ्या आणि अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीला लुटणाऱ्या जालन्याच्या नराधमास सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे.
हिंदनगर, नवीन मोढा जालना येथील नासेरखान अफसरखान (वय 27) हा इगल ब्रॉडबॅन्ड सर्वीसेस जिदल मार्केट जालना येथे ऑपरेटर म्हणून कामाला आहे. नासेर खान हा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय होता. त्याची
मुंबई येथील एका तरुणीसोबत इंस्टाग्रामवर मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर शारीरिक संबंधात झाले.
त्या तरुणीला जालना येथे बोलावून जिंदल मार्केटमधील एक दुकानात आणि रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजवर नेऊन त्याने अनेक वेळा बलात्कार केला आणि त्या तरुणीचे अश्लील फोटो काढले. या फोटोच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून गुगल पे ने लाखो रुपयांची रक्कम उकळली.
याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाणे पश्चिम मुंबई येथे पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून सदर बाजार पोलीस ठाण्यात वर्ग केला होता. पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे गुरन 708/2020 कलम 376(2), (एन), 354(अ), (क), 509, 506, 406, 417, भादंवि सह 66 (अ) IT act प्रमाणे दाखल झाला होता. आरोपी नासेरखान अफसर खान याच्या सदर बाजार पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यास न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.