जालना - अजमेर येथून विक्रीसाठी आणलेला गांजा सदरबाजार पोलिसांनी जप्त करून तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून धारदार शस्त्र चारचाकी वाहन आणि गांजा जप्त केला आहे.
रात्री अडीच वाजेच्या सुमारास सदरबाजार पोलीस गस्त घालत होते. यावेळी जवाहर बाग परिसरामध्ये एक चारचाकी वाहन गांजा घेऊन आल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. त्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांनी जवाहर बागेजवळ सापळा रचून चारचाकी वाहनाची झडती घेतली.यावेळी किसन रंगनाथ धनवटे (वय 30), प्रेम किशोर पेशवानी (वय 29) आणि सर्जेराव श्रावण पवार (वय 55) यांच्याकडे चौकशी केली. यावेळी कपड्याच्या बॅगमध्ये लपवलेले प्लास्टिकच्या पिशवीतील 1 हजार 984 किलोग्रॅम अंमली पदार्थ अर्थात गांजा सहएक घातक शस्त्र म्हणजे धारदार गुप्ती आणि तीन मोबाइल सापडले. या साहित्यासह पोलिसांनी वाहन जप्त केले आहे. असा एकूण पाच लाख 27 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान वाहनांमध्ये असलेला गांजा हा अजमेर येथून विक्रीसाठी आणला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि अन्य कलमान्वये सदर बाजारपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय देशमुख ,सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, योगेश चव्हाण यांच्यासह दिलीप लांडगे, विजय कदम ,समाधान तेलंग्रे आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.