जालना - औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक केएम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचा नियोजित दौरा आजपासून सुरू झाला आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते आज सकाळी १० वाजता चंदंनजिरा पोलीस ठाण्याला भेट देणार होते. मात्र, प्रसन्ना हे एक तास अगोदरच पोलीस ठाण्यात पोहोचल्याने ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. नियोजित वेळेपूर्वी ठाण्यात येण्याचे कारण काय, हे नेमके कळू शकले नाही.
आधी माहिती मग बैठक
प्रथेनुसार विशेष पोलीस महानिरीक्षक आल्यानंतर ते पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन मानवंदना स्वीकारतात आणि नंतर कामाला सुरुवात होते. मात्र, आज पहिल्यांदा एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मानवंदना स्वीकारली. यासंदर्भात बोलताना मल्लिकार्जुन प्रसन्ना म्हणाले की, मी आधी जिल्ह्यामध्ये दौरा करून सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया, पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या अडचणी समजून घेऊन नंतर पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. अडचणी समजल्यानंतर त्यावर अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देता येईल. त्यामुळे, हा बदल करण्यात आल्याचे आयजी प्रसन्ना यांनी सांगितले.
हेही वाचा - उद्यापासून औरंगाबादच्या पोलीस महानिरीक्षकांचा तीन दिवसीय जालना दौरा
तपासणीला फक्त दहाच पेट्या
चंदंनजिरा पोलीस ठाण्यांतर्गत सुमारे 45 कर्मचारी कार्यरत आहेत. आणि आज या कर्मचाऱ्यांची तत्परता पाहाण्यासाठी, त्यांची तयारी पाहाण्यासाठी त्यांची दप्तर तपासणी केली जाते. त्यामुळे, त्यांना एक पेटी देण्यात येते. या पेटीमध्ये ते त्यांचा गणवेश, बूट, शिरस्त्राण, आदी साहित्य ठेवतात. या सर्व साहित्याची पाहाणी विशेष पोलीस महानिरीक्षक करतात. त्यामुळे, या पेट्या पोलीस ठाण्याच्या आवारात असणे बंधनकारक असते. मात्र, 45 पैकी फक्त दहाच पेट्या पोलीस ठाण्यात पाहायला मिळाल्यामुळे प्रसन्ना यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजले.
कर्मचाऱ्यांची झाली गैरसोय
दहा वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक येणार असल्याने सर्वजण त्या वेळेनुसार येणार होते. मात्र, आयत्यावेळी धावपळ झाल्याने कर्मचारी धावत-पळत पोलीस ठाण्यात आले. मात्र, येथे अल्पोपहाराची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने आणि परिसरात कुठलेही उपाहारगृह नसल्यामुळे संरक्षक भिंतीच्या पलीकडून मिळेल त्या खाद्यपदार्थांवर कर्मचाऱ्यांना ताव मारावा लागला. तर, काहींना उपाशी बसावे लागले. यामुळे कर्मचारी नाराज झाले होते.
हेही वाचा - बदनापूरमध्ये अग्निशमन दल स्थापन करण्याची मागणी