जालना - बायकोच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या परिसरात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांनी सहकाऱ्यांना न्यायालयात पाठवून त्या व्यक्तिला सामान्य रुग्णालयात हलवले. वेळीच उपचार मिळाल्याने व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे.
बायकोचा त्रास देत असल्याचा आरोप -
जालना तालुक्यातील बाजिउम्रद येथील एक ३५ वर्षीय व्यक्ती सध्या बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे राहतो. 2006मध्ये त्याचे लग्न बीडच्या गेवराई तालुक्यातील एका मुलीशी झाले. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्याची पत्नी माहेरी राहायला गेली. असे असतानाही त्याला दोन अपत्ये आहेत. पत्नी वारंवार माहेरी जाऊन राहते या कारणामुळे तो वैतागला होता. त्यातच पत्नीच्या भावांनी या व्यक्तीला व त्याच्या आई-वडिलांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याने शनिवारी दुपारी न्यायालयाच्या परिसरात विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
वहीच्या पानावर लिहिली होती आपबीती -
न्यायालयाच्या प्रवेशद्वारा समोरच असलेल्या चौकशी कक्षाजवळ या व्यक्तीने विषारी औषध पिले. पिकावरील फवारणीसाठी वापरले जाणारे हे औषध होते. त्याच्या सोबत वहीच्या चार पानांवर त्याने आपली आपबिती लिहिली होती. पोलिसांनी ही वहीची पाने देखील ताब्यात घेतली आहेत. त्यामध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट लिहिले आहे. तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या भागचंद तोताराम नागलोत यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.