जालना- तोंडावर स्प्रे मारू आणि घरातील व्यक्तींना एका खोली कोंडून साहित्य लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना जालना शहरातील रामनगर भागातील साईनगरमध्ये घडली. आर्थिक देवाणघेवाणीतून आणि घर रिकामे करण्याच्या वादातून 27 तारखेला हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी दुसऱ्या ठिकाणी ठेवलेले साहित्य आणि आरोपीला ताब्यात घेतले आहे.
अशी घडली घटना -
साईनगर भागामध्ये आशाबाई कडूबा सरकटे (वय -65) या सन 2010 पासून एका घरात राहतात. त्यांच्यासोबत दोन मुले भगवान आणि विष्णू तसेच दोन सुना आणि नातवंडे राहतात. 27 तारखेला संध्याकाळी साडेआठच्या सुमारास ते जेवत असताना ढोरपूरा येथे राहणारे निलेश भिकाजी भिंगारे हे आले आणि त्यांना घर रिकामी करण्यास सांगितले. मात्र, आशाबाई यांनी या घराचे अर्धे पैसे दिले आहेत. उर्वरित पैसे आठ-दहा दिवसात देते असे सांगितले होते. मात्र, निलेश भिंगारे हे कोणत्याही परिस्थितीत आशाबाईंचे म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी या सर्वांच्या तोंडावर स्प्रे मारून त्यांना एका खोलीत कोंडले आणि सोबत आणलेल्या आठ-दहा मित्रांनी आयशर ट्रक मध्ये सामान भरून दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकले. सामान घेऊन गेल्यानंतर त्यांना पुन्हा खोलीच्या बाहेर काढले.
तक्रारीमध्ये आर्थिक व्यवहाराचा उल्लेख -
निलेशचे वडील भिकाजी भिंगारे यांच्याकडून आशाबाई सरकटे यांनी चार वर्षांपूर्वी पाच लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर पुन्हा एका वर्षांनी आणखी चार लाख रुपये दर महिना पंधरा हजार रुपये व्याजाने घेतले. मात्र, ती परतफेड झाली नाही त्यामुळे अशा बाईच्या म्हणण्यानुसार भिकाजी भिंगारे यांनी आशाबाईचे घर नावावर करून घेण्यासाठी तगादा लावला. जर घर नावावर नाही केले तर आत्महत्या करण्याची धमकी कडुबा यांनी दिली. त्यामुळे आशा बाईंनी सध्या राहत असलेले घर भिकाजी भिंगारे यांच्या नावावर करून दिले आहे. मात्र, उर्वरित रक्कम मिळाली नसल्यामुळे भिकाजी भिंगारे यांचा मुलगा निलेश भिंगारे याने हे घर रिकामे करण्यासाठी वारंवार सूचना केल्या. घर रिकामे न झाल्याने त्याने 27 तारखेला रात्री ही घटना घडवून आणली.
घरातील हे साहित्य पळवले -
लेश भिंगारे यांनी सोबत आणलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आशाबाई सरकटे यांच्या घरातील स्टील कपाट, पितळी हंडे, फ्रिज, टीव्ही, लोखंडी, कपाट, दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स, घराच्या रजिस्ट्रीची महत्त्वाचे कागदपत्रे, बौद्ध मूर्तींचा जुना सेट, असे एकूण सुमारे 52 हजार रुपयांचे साहित्य ट्रकमध्ये भरून नेले. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सामान कुठे ठेवले आहे, याचा तपास काढला आणि त्या घरातून ट्रकसह हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईच्या छडा लावण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, समाधान तेलंग्रे ,इरशाद पटेल, वैभव खोकले, मोहन हिवाळे, जतीन ओव्हाळ, यांनी काम केले.