जालना - जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील गोदावरी नदीवर असणारा हिरडपुरी उच्च पातळी बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. बंधाऱ्याचे दोन गेट उघडण्यात आले असून त्यातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात जोरदार पाऊस -
जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला. सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बंधाऱ्यात पाण्याची आवक सुरू असल्याने अधिकचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येऊ शकते. त्यामुळे तरी हिरपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात येत आहे.