जालना - लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार आग्रही असून या संदर्भात राज्य सरकार तयारी करत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे आग्रह धरणार असल्याचे देखील टोपे यांनी सांगितले. त्यासाठी कोव्हक्सीन आणि झायड्स या लसींचे नियोजन करण्यासाठी सूचना देण्यात आल्याचे देखील टोपे म्हणाले.
खाजगी क्षेत्राला या लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेता येईल का, याबाबत देखील विचार सुरु असून मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा वाढवण्यासाठी सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले. काल मुंबईत कोरोनाचा एकही मृत्यू नसून ही समाधानाची बाब असून तिथे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याचे ते म्हणाले. याचेच अनुकरण संपूर्ण राज्यात होणार असून मिशन कवचकुंडलची वाढ करणार असल्याचे टोपे म्हणाले. राज्यात लसीकरणाला गती देणार असून आतापर्यंत राज्यात 9 कोटी लसीकरण झाल्याचे ते म्हणाले. देशात लसीकरणात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य असून आपल्याला लसीकरण वाढवण्याचे असल्याचे देखील ते म्हणाले.
हे ही वाचा - Maharashtra Unlock : यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त.. राज्यातील निर्बंध आणखी शिथील, उपाहारगृहे व दुकानांच्या वेळा वाढणार
22 ऑक्टोबरपासून निर्बंध शिथील -
22 ऑक्टोबरपासून अम्युझमेंट पार्क सुरू होणार असून तिथे लोकांनी कोरोनासाठी घालून दिलेले नियम पाळावे, असं आवाहन त्यांनी केलं. राज्यात शाळा सुरू झालेल्या असून आता आणखी शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे शिक्षकांनी लसीकरण करून घेतलेले असावे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देखील लसीकरण करणे गरजेचं आहे. मात्र त्यासाठी सक्ती नसल्याचे टोपे म्हणाले. कॉलेज देखील सुरु होत असून विद्यार्थ्यांनी देखील लसीकरण करून घ्यावे, असेही ते म्हणाले. राज्यात दररोज 7 ते 8 लाख लसीकरण होत असून ज्यांनी लसीकरण केलेलं नाही अशा सगळयाच घटकांना लसीकरण केंद्रावर आणून त्यांना लसीकरण करून घ्यावे लागणार आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करणार असल्याचे सांगत या लसीकरणासाठी वार्डवाईज नियोजन करणार असल्याचे देखील टोपे म्हणाले. राज्यात 70 टक्क्यांपर्यंत पहिल्या डोसचे लसीकरण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.