जालना - अंबड पोलिसांनी रोहिलागड शिवारातील कानीफनाथ आश्रमासह गुटखामाफियाच्या घरी आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी ४६ पोते गुटखा जप्त करण्यात आला. या गुटख्याची किंमत ७ लाख रुपये असून गुटखामाफिया फरार झाला आहे.
रोहिलागड शिवारात पोलीस गस्त घालत असताना बंद असलेल्या कानीफनाथ आश्रमात गुटख्याचा साठा असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्याठिकाणी छापा टाकला असता दोन खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला. हा गुटखा जामखेड येथील गुटखामाफिया अनिल भोजने याच्या मालकीचा असल्याचे कळताच त्याच्या घरावरही पोलिसांनी छापा टाकला. यावेळी दोन्ही छाप्यामध्ये सुमारे ७ लाख रुपये किमतीचा 46 पोते गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे, असे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी सांगितले. तसेच ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्ण चव्हाण पाटील, पोलीस कर्मचारी संदीप पाटील, संदीप कुटे, संतोष वणवे यांनी केली.
पुजाऱ्याचे निधन झाल्याने आश्रम बंद -
रोहिलागड शिवारातील कानिफनाथ आश्रमाचे साधक व पुजारी असलेल्या पती-पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. त्यामुळे हे आश्रम बंद होते. मृत पुजारी दाम्पत्य हे गुटखामाफियाचे नातेवाईक होते. त्यामुळे त्याने या आश्रमातील काही खोल्या ताब्यात घेऊन त्याचा गोडाऊन म्हणून उपयोग सुरू केला होता.