जालना GST Raid in Jalna : जालन्यातील औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपन्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून केंद्रीय जीएसटी विभागाकडून झाडाझडती सुरू आहे. गुजरातमधून आलेल्या भंगाराची बनावट बिलांच्या आधारे खरेदी केल्याच्या संशयावरून नागपूरच्या पथकाकडूनही झडती घेण्यात आलीय. गेल्या तीन दिवसांत 10 ते 12 जणांच्या पथकाकडून ही तपासणी सुरू आहे. एका कंपनीचे रेकॉर्डदेखील या पथकानं जप्त केल्याची माहिती मिळतेय.
कारवाईबाबत अत्यंत गोपनियता : जीएसटीच्या केंद्रीय पथकाची ही कारवाई अत्यंत गुप्तपणे ठेवण्यात येत आहे. मागील तीन दिवसांपासून जीएसटी पथकाचे अधिकारी जालना शहरामध्ये तळ ठोकून आहेत. शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये या पथकानं मुक्काम केला. गेल्या तीन दिवसांपासून औद्योगिक वसाहतींमधील काही नामांकित कंपन्यांवर छापेमारी सुरू आहे. या कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता बाळगली जात असून माध्यमांसमोर कोणत्याही गोष्टी सांगितल्या जात नाही. नेमकी काय कारवाई होत आहे, हे अजूनही गुलदस्तातच आहे.
याआधीही आयकर विभागाची कारवाई : जालना हा पोलाद उद्योगासाठी सर्वत्र ओळखला जातो. याच पोलाद उद्योगातील काही कारखानदारांवर या आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी आयकर विभागानं धाडी टाकल्या होत्या. यामुळं एकच खळबळ माजली होती. स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरे-कार्यालयांवर प्राप्तिकर विभागानं धाडी टाकल्या होत्या. या कारवाईत सुमारे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली होती. त्यात 58 काेटींची राेकड, 32 किलाे साेन्याचे दागिने, हिरे, माेती असा 16 काेटींचा ऐवज तसंच सुमारे 300 काेटींच्या बेहिशेबी मालमत्तेचा समावेश होता. त्यावेळी धाडी गोपनीय राहण्यासाठी कोडवर्डचा वापर करण्यात आला. आयकर पथकांनी धाडी घालताना पोलाद व्यावसायिक व त्यांच्याशी संबंधित लोकांना कळू नये, बातमी फुटू नये यासाठी खूप काळजी घेतली. मुंबईसह नाशिक, पुणे, ठाणे या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचा पथकामध्ये समावेश होता. त्यांच्या वाहनांमधून लग्नाचे वऱ्हाड प्रवास करतेय, असं भासवण्यासाठी वरवधूंच्या नावांचे स्टिकर लावले होते. काहींनी ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असा मजकूर असलेले स्टिकर लावले होते. तसंच पथकातील अधिकाऱ्यांना कोडवर्डही दिले होते.
हेही वाचा :