जालना - सोशल मीडियावर शुक्रवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा सुरू होत्या. या अफवांना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज पूर्णविराम दिला. आजतरी लॉकडाऊन नाही, तथापि लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी जनतेला पुरेसा वेळ देऊ, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - आयशर टेम्पोची दुचाकीस्वार दोन महिलांना धडक.. एकीचा मृत्यू एक गंभीर, दुचाकीही जळाली
जालना जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या परभणी, बीड येथे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. औरंगाबादचे लॉकडाऊन नुकतेच उठले आहे. अशा परिस्थितीमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा कालपासून सुरू झाल्या होत्या. मात्र, या अफवा अफवाच निघाल्या आहेत. आज जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. तसेच लॉकडाऊन लावायचे असेल तर नागरिकांना पूर्वसूचना दिली जाईल, त्यांना खरेदीसाठी पूर्ण वेळ दिला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
होळी सणाबद्दल सूचना
दोन दिवसावर आलेल्या होळी आणि धुळवड सण साजरा करण्याबद्दल पोलिसांकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांबद्दलही जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. सण साजरा करावा, मात्र कायद्याने घालून दिलेले बंधनही पाळावेत आणि ही बंधने काय असतील हे शनिवारी जाहीर केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा - मुंबईतील मोठ्या आग दुर्घटना!