जालना - दोन महिलांसोबत लग्न झाल्यानंतर तिसऱ्या मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून आणल्याची घटना जालना येथे घडली आहे. नागपूर येथील कुशिनगर नारा रोड जरिपटका येथे राहणाऱ्या पीडित मुलीच्या भावाने याने दिनांक 14 मार्च 2020 रोजी नागपूर येथील पोलीस ठाण्यात त्याची 24 वर्षीय बहीण हरवल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, या बहिणीला मंठा येथे राहणाऱ्या दिपक गायकवाड याने पळवल्याची शक्यता वर्तवली होती. यानंतर मागील तीन महिन्यांपासून नागपूर येथील या तरुणीला जालन्यातील शंकरनगर भागात डांबून ठेवले होते. या तरुणीचा कदीम जालना पोलिसांनी शोध घेतला आणि पीडित तरुणीला तिच्या भावाच्या स्वाधीन केले आहे.
या तरुणीला दीपक गायकवाड या व्यक्तीने जालना येथे आणून शंकरनगर भागात राहणाऱ्या भारत पवार याच्या घरी ठेवले होते आणि दीपक गायकवाड मंठा येथे निघून गेला होता. तेव्हापासून कालपर्यंत या तरुणीवर भरत पवार आणि त्याच्या घरच्यांनी नजर ठेवली होती. तिला कोणासोबतही बोलता येत नव्हते. या तरुणीला दिपक गायकवाड याने घेऊन जावे, या संदर्भात भरत पवार यानी वारंवार फोन करून सांगितले. मात्र, त्याने तरुणीला नेले नाही.
हेही वाचा... चारित्र्याच्या संशयावरून सासरच्यांनी केले महिलेचे मुंडन; कोल्हापूरातील तेरवाडमधील घटना
शेवटी भरत पवार याच्या घरात तरुणीमुळे भांडणे होऊ लागली. या भांडणातून तरुणीने कसाबसा वेळ काढून तिच्या नागपूर येथील भावाला फोन केला. नितीनने कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर प्रशांत महाजन यांनी या मोबाईल लोकेशनच्या आधारे महिला पोलीस कर्मचारी आणि अन्य सहकाऱ्यांसह भरत पवार यांचे घर गाठले आणि त्या तरुणीला ताब्यात घेतले.
तिला ताब्यात घेतल्यानंतर प्रशांत महाजन यांनी मुलीच्या भावाला जालन्याला बोलावून घेतले. काल शुक्रवारी रात्री आठ वाजता नितीन आणि त्याच्या दोन बहिणी जालन्याकडे निघाल्या. आज (शनिवार) सकाळी नऊ वाजता हे तिघे जालन्यात पोहोचले. दरम्यानच्या काळात पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दीपक गायकवाडचा शोध घेऊन त्याला पोलीस ठाण्यामध्ये बोलावून घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सर्व घटना सांगितली.
हेही वाचा... संतापजनक..! इस्लामपूरमध्ये सात वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार
सदर मुलीला दीपक गायकवाड यानीच बोलावून घेतले होते. दीपकचे यापूर्वी दोन लग्न झालेली आहेत. हे त्याने तिला सांगितले नव्हते. जेव्हा दीपकची दोन लग्न झालेली आहेत, हे तिला समजले. तेव्हा तिने आपल्या भावाशी संपर्क साधला आणि हे या प्रकरणाचे बिंग फुटले. दिपक गायकवाड याचे दोन लग्न झाली आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीला दोन मुले आहेत पण तिला सोडून दिले आहे. तर दुसऱ्या पत्नीला एक मुलगी असून ती दुसऱ्यांदा गरोदर आहे. त्यानंतर त्याने आता या पीडित मुलीला नागपूरहून पळवून आणले आहे.
दरम्यान, तीन महिन्यांपासून डांबून ठेवलेल्या या मुलीसोबत मागील आठ वर्षांपूर्वी दीपक गायकवाडचा संपर्क झाला होता. दीपकचे पाहुणे या मुलीच्या शेजारी राहत होते. त्यावेळी त्यांचा संपर्क आला होता. मात्र, मध्यंतरी हा संपर्क बंदही झाला होता. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. परंतु, 13 मार्च रोजी पीडित मुलीने नागपूर येथील तिच्या घराजवळ राहणाऱ्या दीपकच्या नातेवाईकांना सांगत घर सोडले आणि दीपकसोबत थेट जालना गाठले. कदीम जालना पोलिसांनी दिपकला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, त्याने ही सर्व माहिती पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, दीपक याच्यावर 2012 पासून विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. या दाखल गुन्ह्यांमध्ये घरफोडी, दरोडा, फसवणूक, खून करण्याचा कट रचणे, असे अनेक गुन्हे दाखल असल्याचेही पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले.