जालना - 28 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील शहागड येथील बुलडाणा अर्बनच्या शाखेतून तीन आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून रोख रकमेसह सोन्याचे दागिने पळवले होते. 3 आरोपींनी हा दरोडा टाकला होता. या दरोड्यातील 3 पैकी दोन आरोपींना पकडण्यात गेवराई पोलिसांना यश आले आहे. गेवराई पोलिसांनी या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून जालन्यातील गोंदी पोलिसांकडे या आरोपींना पुढील तपासासाठी हस्तांतरीत करण्यात आला आहे.
आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी -
दरोड्यातील रकमेच्या वाटाघाटीवरून दरोडेखोरांमध्येच आपापसात वाद झाल्याने हे दोन आरोपी गेवराई पोलिसांच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी चोरीची लाखो रुपयांची रक्कम आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या बंदुकी एका गोणीत ठेऊन ही गोणी लाकडांच्या गंजीत दडवून ठेवल्याचेदेखील गेवराई पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. या आरोपींच्या ताब्यातून गेवराई पोलिसांनी 9 लाख 50 हजार रूपयांची रक्कम, 3 कोटी 42 लाख 17 हजार 711 रुपयांचे कर्जदारांचे बँकेत तारण ठेवलेले सोने असा एकूण 3 कोटी 51 लाख 67 हजार 711 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - ड्रग्ज प्रकरणाचे षडयंत्र रचून भाजपने महाराष्ट्राला बदनाम केले -नाना पटोले