जालना - बुलडाणा सीमेवर असलेल्या वाघरुळ गावाजवळ वाटसरुंना ताजे अन्न देण्याचा उपक्रम सध्या सुरू आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून शांतीनिकेतन विद्यामंदिर जालना, वाघरूळ परिसरातील गावकरी व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या संयुक्त प्रयत्नाने हा उपक्रम सुरू आहे. जालना बुलडाणा सीमेवर असलेले वाघरुळ हे गाव. मुख्य रस्त्याच्या बाजूलाच विघ्नहर्त्या गणेशाचे मंदिर आहे आणि या मंदिर परिसरात या सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या लॉकडाऊन जरी सुरू असले तरी परराज्यातील कामगारांना जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कामगारांचे लोंढे रस्त्याने जाताना दिसत आहेत. वेळी-अवेळी जसे जमेल तसे कोस दरकोस मुक्काम करत हे प्रवासी आपला रस्ता काटत आहेत. रस्त्यावर कुठेही खाण्यापिण्याची काहीही व्यवस्था नाही. त्यामुळे उपाशी असलेल्या या वाटसरूंसाठी हे अन्नछत्र एक वरदानच ठरले आहे. दिवसभर थकून आल्यानंतर इथे गावकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेले ताजे जेवण मिळत आहे आणि जेवण झाल्यानंतर अनेक वाटसरू विश्रांती घेऊन पहाटे पुन्हा पुढील प्रवासाला रवाना होत आहेत. दरम्यानच्या काळात वाटसरू ज्या ठिकाणी विश्रांती करत आहेत त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी केली जात आहे. स्वतः ची काळजी घेत प्रवाशांचीही काळजी इथे केली जात आहे.
पुरी भाजी आणि खिचडी खाऊन प्रवासी तृप्त होताना दिसत आहेत. त्यासोबत सामाजिक अंतराचे भानही येथे ठेवल्याचे पाहावयास मिळाले. प्रवासादरम्यान जीवाची, अपघाताची पर्वा न करता मिळेल त्या वाहनाने प्रवास सुरू आहे. दुचाकीवर दोन मुले पती-पत्नी आणि सामान असा धोकादायक प्रवास सध्या केला जात आहे. हे सर्व धोके पत्करून घर जवळ करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना पोटभर जेवण देण्याचा हा उपक्रम वरदान ठरत असल्याच्या प्रतिक्रिया या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या अनेकांनी दिली आहे.