जालना - प्रशासनाला हातभार लावण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी लायन्स कुटुंबाच्या वतीने गरजूंसाठी मोफत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या मोहिमेला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी या मोहिमेची पाहणी करून, अशा प्रकारचा उपक्रम आणखी काही दिवस सुरू ठेवावा, असे आवाहन केले.
हेही वाचा - कर्जासाठी एसबीआयसमोर 5 दिवसापासून आमरण उपोषण; उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
कोविड-19 ची लस उपलब्ध झाली आहे. मात्र, अनेकांना गर्दीमुळे सरकारी दवाखान्यात जाऊन ती घेणे शक्य होत नाही. आणि खासगीमध्ये पैसे मोजावे लागतात, त्यामुळे कोरोना लसीकरणाकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. परिणामी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ही अडचण लक्षात घेऊन लायन्स कुटुंबाच्या वतीने लायन्स क्लबचे उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांच्या पुढाकाराने मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. ४५ वर्षे वया पुढील प्रत्येकाला लस दिल्या जाणार आहे. केवळ छोट्याशा नोंदणीवर किंवा आधार कार्डनुसार वयाचे 45 वर्ष पूर्ण करणारा कोणताही व्यक्ती या लसीकरणासाठी पात्र आहे. आज पहिल्याच दिवशी 500 रुग्णांनी आपली नाव नोंदणी केली आहे.
जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केली पाहाणी
जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या शिबिराची पाहाणी केली आणि तेथील सोयीसुविधा पाहून हे शिबिर आणखी काही दिवस चालू ठेवावे, असे आवाहन केले आहे. तसेच, सर्वच रुग्णालयांमध्ये कोविड-१९ चे रुग्ण भरती असल्यामुळे अनेक जण ही लस घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. मात्र, अशा सुरक्षितस्थळी गरजूंनी लस घेऊन कोरोनापासून दूर राहावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हंटले.
हेही वाचा - आकरम फातेमा माध्यमिक कन्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव