जालना - वृक्ष लागवड आणि संवर्धन ही जबाबदारी फक्त शासनाचीच राहिलेली नसून ती सर्वांचीच झाली आहे. या कामाकडे सरकारी काम म्हणून बघू नका. वृक्ष लागवडी सोबतच वृक्षसंवर्धन ही चळवळ व्हावी, अशी अपेक्षा राज्याचे पाणीपुरवठा तथा जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी वृक्ष लागावडीवरून आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
पूर्वीच्या सरकारने केलेली वृक्ष लागवड ही सर्व वांझोटी-
तसेच पूर्वीच्या सरकारने केलेली वृक्ष लागवड ही सर्व वांझोटी होती. त्यांनी फक्त देखाव्यांवर भर दिला. गुलमोहरासारखी सुंदर दिसणारी झाडे लावली. मात्र, त्याचा पर्यावरणाला कुठलाही उपयोग झाला नाही. आता ज्या ५१ जातीच्या झाडांची लागवड होणार आहे, त्यामध्ये वड, पिंपळ, लिंब, सौंदड, आपटा, या झाडांचा समावेश आहे. या झाडांमुळे जमिनीची धूप थांबणार असून त्याचबरोबर पक्षांच्या चाऱ्याचीही व्यवस्था होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक वनीकरण आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जालना जिल्ह्याला १ कोटी ५ लाख ४७ हजार ४५० रोपटी लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पुढील महिन्यांमध्ये हे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
झाडे नसल्यामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत. यात शेतकऱ्यांची आत्महत्या ही एक मोठी समस्या आहे. झाडे नाहीत म्हणून पाणी नाही, पाणी नाही म्हणून शेतीचे उत्पन्न नाही, आणि शेतीत उत्पन्न नाही म्हणून शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे. आणि बोज्यापायीच शेतकरी आत्महत्येच्या आहारी जातो. त्यामुळे आता पुढील पिढीसाठी वृक्ष संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला रोपे देण्यात येणार आहेत. त्यांनी ती जगवायची आहेत. जे सरपंच, ग्रामसेवक या उपक्रमात हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला राज्यमंत्री अर्जुन खोतकर, यांच्यासह जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण जालना चे पी.व्ही. जगत, सहाय्यक वनसंरक्षक के .बी. पांडे, प्रशांत वरुडे, श्रीमती पुष्पा पवार, यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती वृषाली तांबे, श्री ईटलोड , श्री एम .एम. महाडिक आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते वृक्षदिंडीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणही करण्यात आले.