जालना - लोकशाहीच्या उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीतला महत्त्वाचा टप्पा असलेली मतदान प्रक्रिया शहर व जिल्ह्यात उद्या पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे. प्रशासनाच्यावतीने आज निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर ३३१ मतदान केंद्रांवर मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले आहेत.
औरंगाबाद महामार्गावरील जालना औद्योगिक प्रशिक्षण केंद्रावरील मैदानात सर्व मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज सकाळी बोलाविण्यात आले होते. या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. प्रशासनाने मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शीपणाने पार पडण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याची ही व्यवस्था कशी असणार आहे ? सुरक्षेची व्यवस्था काय असणार आहे? याबाबतच्या सूचना उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
निवडणूक साहित्याचे वाटप-
हे साहित्य संबंधित केंद्रप्रमुखांनी ताब्यात घेऊन त्याची पाहणी केली. या साहित्यासोबतच अनावधानाने काही अपघात घडल्यास प्रथमोपचार पेटीदेखील देण्यात आली आहे.आज सकाळपासून निवडणूक साहित्य वाटपाचा कार्यक्रम बारा वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर संबंधित केंद्रप्रमुख व कर्मचारी आपल्या साहित्यासह नियोजित ठिकाणी रवाना झाले आहेत .
जेवण्यासाठी भत्ता रोख स्वरुपात दिला जाणार-
दरम्यान ग्रामीण भागातील केंद्रप्रमुख आणि कर्मचाऱ्यांना आज संध्याकाळचे जेवण आणि उद्याचे जेवण तलाठ्यामार्फत पुरविण्यात येणार आहे. तर अन्य ठिकाणी ७५ रुपये एक वेळेस अशा दोन वेळेस भत्ता रोख स्वरूपात संबंधित कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.
निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की जिल्ह्यात १८०० अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यापैकी ३२ क्षेत्रीय अधिकारी आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी ५०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. मतदान यंत्रात बिघाड झाल्यास कमीत कमी वेळेत मतदान यंत्र बदलता यावे, म्हणून राखीव मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार केशव औताडे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर शरदचंद्र वानखेडे या तिघांमध्ये लढत होणार आहे. या तिघांसह अन्य १७ असे एकूण २० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.