जालना - हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर जालन्यात पुष्पवृष्टी करण्यात आली. औरंगाबादहुन हिंगोलीकडे सायंकाळच्या सुमारास हे पार्थिव जात होते. अंबड चौफुली भागामध्ये सर्वपक्षीय राजकीय मंडळींनी सातव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र पार्थिव घेऊन जाणारी रुग्णवाहिका इथे न थांबल्यामुळे नेत्यांनी या रुग्णवाहिकेवर पुष्पवृष्टी करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती पहायला मिळाली.
'युवकांचा आवाज दबला'
शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सातव यांना श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले, की राजीव सातव यांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. दिल्लीच्या राजकारणात मराठवाड्याचा दबदबा त्यांनी निर्माण केला होता आणि युवकांचा ते आवाज होते. आज हा आवाज दबला गेला आहे, त्यांनी दिल्लीतील गांधी घराण्याचा विश्वासही संपादन केला होता आणि त्यांचा मराठवाडा ते दिल्ली हा राजकीय प्रवास युवकांसाठी प्रेरणादायी होता.
हेही वाचा -काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन