जालना- औद्योगिक वसाहतीमध्ये काल दुपारी झालेल्या स्फोटातील मृत कामगारांची संख्या पाचवर पोहचली आहे. तर सहा जण गंभीर जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा- येस बँकेवर निर्बंध, एटीएमबाहेर रांगा, सणासुदीला ग्राहकांची आर्थिक कोंडी
औद्योगिक वसाहतीमधील ओम साईराम या लोखंडी सळई बनवणाऱ्या कंपनीत काल स्फोट झाला. त्यामध्ये अनेक कामगार जखमी झाले होते. त्यापैकी राहमीतसिंह व्रजभानसिंह (वय 21 करोदिया, मध्य प्रदेश), भरत रामदेव पंडित (वय 31, दुमरी, सीतामढी बिहार), अजयकुमार रामशकल सहानी (वय 22 मदनपूर बिहार) यांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित दोन कामगारांचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला.
दरम्यान, जखमी असलेले सहा कामगार औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे हे सर्व अकरा कामगार परराज्यातील होते.
दरम्यान, उत्तर प्रदेश येथील ठेकेदार अनिल कुमार नंदुराम यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये ओम साईराम कंपनीचा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीमध्ये भट्टी क्रमांक दोनमध्ये 30 टन वितळलेले लोखंडाचे पाणी घेऊन जात असताना ते अचानक उडून बाहेर आले. यात पाच कामगारांचा मृत्यू झाला. तर सहा कामगार जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे अधिक तपास करीत आहेत.