जालना- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपाच्यावतीने शहरातील स्वातंत्र्यवीर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात असलेला जिल्हाधिकार्यांचा आदेश पायदळी तुडवल्या कारणावरून भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आंदोलन
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एक कोटी रुपये मागणी केल्याचा आरोप वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज दिनांक 21 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान आंदोलन केले. या आंदोलनात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची ही मागणी करण्यात आली आहे. आंदोलन करत असताना कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क लावला नव्हता तसेच आपत्ती व्यवस्थापन संदर्भात असलेला जिल्हाधिकार्यांचा आदेश पायदळी तुडवला. म्हणून सदर बाजार पोलीस ठाण्यात या कार्यकर्त्यांविरुद्ध जमावबंदीचा आदेश मोडणे तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा आदेश मोडण्यासंदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापनाचे लावले कलम
अनिल देशमुख यांच्या विरोधात घोषणा देत असतानाच जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्च मध्यरात्रीपर्यंत काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी कलम 269, 188, 135 या मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आंदोलकांमध्ये, भास्कर दानवे, सिद्धिविनायक मुळे, भागवत बावणे, आकाश देशमाने, सुनील खरे, महेश निकम, उषा पवार, संध्या देठे, शुभांगी देशपांडे, आदि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.