जालना - जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकरी आणि खते, बी-बियाणे पुरविणारे प्रशासन दोघेही सज्ज झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या बांधावर खते उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. यासोबत मागील वर्षी अवेळी पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पूर्ण भिजले होते. त्यातच उत्पादन झालेल्या सोयाबीनमधून शेतकऱ्यांनी चालू हंगामासाठी बियाणे काढून ठेवले होते. ही बियाणे भिजलेली असल्यामुळे याची उत्पादन क्षमता पाहण्यासाठी कृषी विभाग पुढे आला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या बियाणांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली झाली आहे. गेल्या वर्षी 30 किलो सोयाबीनची बॅग 1 हजार 950 रुपये म्हणजेच 65 रुपये किलोप्रमाणे मिळत होती. तर, यावर्षी दर वाढून ही बॅग 2 हजार 220 रुपयांना मिळत आहे.
जालना जिल्ह्यामध्ये 5 लाख 32 हजार 500 हेक्टर हे सरासरी क्षेत्र ग्राह्य धरले आहे. या क्षेत्रामध्ये महत्त्वाचे पीक म्हणजे कापूस हे 2 लाख 98 हजार 750 हेक्टरवर तर, सोयाबीन 1 लाख 35 हजार 750 हेक्टरवर प्रस्तावित आहे. त्यापाठोपाठ मका 54 हजार, तुर 47 हजार, मुग 22 हजार, संकरित बाजरी 70 हजार, उडीद 11 हजार, भुईमूग 1हजार, संकरित ज्वारी 135 हेक्टर याप्रमाणे प्रस्तावित आहे. खतांमध्ये शेतकऱ्यांना लागणाऱ्या डीएपी, एनपीके, युरिया अशा सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता प्रशासनाच्यावतीने करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही खताची टंचाई नाही. म्हणून शेतकऱ्यांनी कसल्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.