बदनापूर (जालना)- पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी प्रशासकीय स्थरावर हलगर्जीपणा व नियमित पाठपुरावा नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून बदनापूर सारख्या ग्रामीण तालुक्यातील शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. योजनेसाठी अर्ज केलेले जवळपास १२ ते १५ टक्के शेतकरी वंचित आहेत. यासाठी तालुकास्तरावर शेतकऱ्यांना मदत केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना लागू सुरू केली. योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपये देण्यात येतात. या योजनेतंर्गत चार महिन्यातून एकदा २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. वर्षातून तिनदा एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात.
मात्र, या योजनेची अंमलजबावणी करत असताना स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा होत नसल्यामुळे प्रचंड अनियमितता आहे. शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. बॅंक खात्याला आधार लिंक करावा लागतो. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे बोटांचे ठसे न जुळणे, आधार कार्डावरील नावात व बँक खात्यावर वेगळे नाव अशा कारणांने ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना लाभच मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
याबाबत बदनापूर तालुक्यातील आढावा घेतला असता, 30 हजार 180 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी 26 हजार 509 शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर सन्मान योजनेतील निधी येत आहे. मात्र, उर्वरित 3 हजार 671 शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होत नाही. म्हणजे 30 हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास 3 हजार 500 शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
शेतकऱ्यांना याजनेच्या लाभासाठी वारंवार तहसील कार्यालयात चकरा मारव्या लागत आहेत. तेथील अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्याना मार्गदर्शन करत नाहीत. वारंवार विनंती करुनही एकही हप्ता मिळालेला नाही. महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी सहकार्य करत नाहीत, अशी खंत शेतकरी दत्तात्रय रामभाऊ लहाने यांनी व्यक्त केली.
आम्ही शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करुन या योजनेबाबत पाठपुरावा करतो. ही योजना संपूर्णत: ऑनलाईन असल्यामुळे बँक खात्यावरील नावात व आधार कार्डवरील नावात फरक असल्यास या योजनेतील निधी येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा गैरसमज होतो. तसेच काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असते. त्यामुळेही शेतकऱ्यांना निधी उपलब्ध होऊ शकत नाही. बदनापूर तहसील कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो, अशी प्रतिक्रिया तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली.