जालना - वीज वितरण कंपनीने वीज पंपासाठी पुरवलेला वीज पुरवठा थकीत वीज बिलापोटी खंडित केला. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी आंदोलकांची भेट घेऊन मध्यस्थी केली.
10 फेब्रुवारीपासून वीज वितरण कंपनीने ज्या शेतकऱ्यांकडे वीज पंपाचे थकीत वीज बिल आहे, त्यांचा पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. उन्हाळा तोंडावर आला आहे आणि पिकांना पाण्याची गरज आहे. त्यातच वीज कंपनीने तोडलेल्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी मिळाले नाही तर हाती आलेले पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी जालन्यातील कन्हैयानगर भागात असलेल्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
आमदार नारायण कुचे यांची मध्यस्थी
बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी या प्रकरणी मध्यस्थी करून अधीक्षक अभियंता यांची भेट घेतली. तूर्तास वीजपुरवठा खंडित करू नये, यासंदर्भात निवेदनही दिले. तसेच वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी शेतकऱ्यांना सूचना द्यावी आणि सध्या काही मुदत दिली असेल तर ती वाढवून द्यावी, अशी मागणी देखील नारायण कुचे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.