जालना - लोकसभा मतदारसंघातील बदनापूर तालुक्यातील बुटखेडा या गावी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बोगस मतदान करण्यावरून तणाव निर्माण झाला. मात्र, गावकरी आणि संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले.
बुटखेडा गावात भाजप कार्यकर्त्यांनी बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या नावावर मतदान केल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे या मतदान केंद्रावर तणाव वाढला. गावात एकच मतदान केंद्र असून ८७५ मतदार आहेत. त्यामुळे सर्व गाव या ठिकाणी जमा झाले. हे प्रकरण बहुजन वंचित आघाडीचे पदाधिकारी दीपक ढोके यांना कळाल्यानंतर त्यांनीही ही त्यांच्या कार्यकर्त्यांसह बुटेगाव येथे धाव घेतली. मात्र, तेथे गेल्यानंतर गावकरी आणि वंचित आघाडीचे पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि त्यांनी हे प्रकरण शांत केले. त्यामुळे गावात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मध्यंतरीच्या काळात थांबलेल्या मतदान प्रक्रियेमुळे मतदान केंद्राबाहेर महिला आणि पुरुषांची मोठी रांग लागलेली होती.