जालना - सामान्य रुग्णालयातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शासनाकडून तीन वर्षांपूर्वीच 12 लाख रुपये देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, काही ना काही कारणे सांगून हे काम टाळले जात होते. यासंदर्भात ईटीव्ही भारतने सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा भोंगळ कारभार उघडकीस आणला होता.
याची दखल घेत पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 24 जानेवारीला हे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने फेब्रुवारीमध्ये हे कामही सुरू केले होते. मात्र, फक्त दगड आणून टाकले आणि पुन्हा काम बंद पडले. या फोडलेल्या दगडांमुळे रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे हे काम म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असे झाले होते.
हेही वाचा - सामान्य रुग्णालय परिसरातील रस्ते दुरुस्तीच्या प्रतिक्षेत,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष
यासंदर्भात 12 मार्चला ईटीव्ही भारतने पुन्हा पाठपुरावा करून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आदेशाला देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने कशी केराची टोपली दाखवली, हे लक्षात आणून दिले होते. त्यानंतर पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभाग जागा झाला आणि गेल्या दोन दिवसांपासून सामान्य रुग्णालयातील या रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. रडत-खडत का होईना पण हे सुरू झालेले हे काम किती गुणवत्तापूर्वक होणार आहे हे आता पाहावे लागेल.