जालना - जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापतीची निवड ३० डिसेंबरला त्या-त्या पंचायत समिती कार्यालयात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ३० तारखेला दुपारी दोन वाजता संबंधित पंचायत समिती कार्यालयात होणाऱ्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यानुसार जालना पंचायत समितीमध्ये श्रीकांत भुजबळ, बदनापूरमध्ये श्रीमती छाया पवार, भोकरदनमध्ये प्रभारी तहसीलदार गौरव खैरनार, जाफराबाद सतीश सोनी, परतूर श्रीमती रूपा चित्रक, मंठामध्ये श्रीमती सुमन मोरे, अंबडमध्ये राजीव शिंदे, तर घनसावंगीत चंद्रकांत शेळके, यांची पीठसीन अधिरकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - राज्य सरकारच्या 'ग्रामीण जीवनोन्नती अभियान' प्रशिक्षिकांचे मानधन थकीत
जालना पंचायत समितीमध्ये १८ सदस्य असून सध्या या पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसची युती आहे. सभापतीपदी शिवसेनेचे पांडुरंग डोंगरे तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या द्वारकाबाई खरात आहेत. मात्र, नवीन झालेल्या आरक्षणामध्ये जालना पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे या पदावर शेवली गणातील भाजपच्या कालींदा अशोक डोके किंवा शिवसेनेच्या रेवगाव गणातील विमल सुधीर पाखरे यांची वर्णी लागू शकते. सध्या पंचायत समितीमध्ये असलेले संख्याबळ पाहता सभापतीपदी रेवगाव गणाच्या विमल सुधीर पाखरे यांची नियुक्ती निश्चित झाल्याचे मानले जात आहे. कारण पंचायत समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे सात काँग्रेसचे चार आणि भारतीय जनता पार्टीचे सात असे संख्याबळ आहे. सध्या असलेल्या युती नुसार शिवसेना आणि काँग्रेसचे संख्याबळ अकरा असल्यामुळे विमल पाखरे यांची सभापतीपदी नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
असे आहे आरक्षण
- जालना - जिल्ह्यांमधील जालना पंचायत समिती अनुसूचित जाती (महिला )
- परतूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग( महिला ).जाफराबाद नागरिकांचा मागास प्रवर्ग
- बदनापूर - सर्वसाधारण महिला
- भोकरदन - सर्वसाधारण महिला
- मंठा - सर्वसाधारण महिला
- अंबड आणि घनसांगवी च्या सभापती पदी सर्वसाधारण उमेदवारांची वर्णी लागणार आहे.