जालना(बदनापूर) - कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस, आरोग्य विभाग, शासन आणि प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. बदनापूरमधील एका 8 वर्षीय मुलीने कवितेच्या माध्यमातून या कोरोना योद्ध्यांचे आभार व्यक्त केले आहेत. ही कविता तिने स्वतः लिहिली आहे.
परिधी राजेश जंजाळ असे या मुलीचे नाव असून ती स्टेपिंग स्टोन विद्यालयात इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत आहे. परिधीने एक कविता रचली असून त्यात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे आभार मानले आहेत. सामान्य नागरिकांनाही सोशल डिस्टनसिंग ठेवण्याचे आवाहन तिने केले आहे. या कवितेत तिने पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, आरोग्यसेवा पुरवणारे आरोग्यदूत आणि पोलिसांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.