जालना- शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर जवाहरलाल नेहरू 'पोर्ट ट्रस्ट'च्या माध्यमातून 'ड्राय पोर्ट'ची उभारणी होत आहे. 'पोर्ट ट्रस्ट'चे अध्यक्ष संजय सेठी यांनी आज कामकाजाची पाहणी केली.
हेही वाचा- सिंचन घोटाळ्याप्रकरणी जनमंचच्या सर्व याचिकांवर १३ फेब्रुवारीला होणार अंतिम निर्णय
जालन्याच्या विकासात महत्त्वाची भर टाकणाऱ्या या 'ड्रायपोर्ट'चे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, या कामाला आणखी गती मिळावी आणि अडचणी असतील तर त्या दूर कराव्यात या उद्देशाने संजय सेठी यांनी पाहणी केली. दरेगाव शिवारात चारशे एकर जागेवर हे 'ड्रायपोर्ट' उभारले जात आहे. जालना रेल्वे स्थानकापासून एक स्वतंत्र पटरी या 'ड्रायपोर्ट' पर्यंत टाकण्यात येणार आहे. तसेच औरंगाबाद महामार्गाला रस्ता जोडण्यासाठी सुरू असलेला उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी ही त्यांनी केली.
2015 मध्ये भूप्रष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून आणि खासदार रावसाहेब दानवे यांच्या मागणीला आलेले हे यश आहे. ही पाहणी केल्यानंतर सेठी यांनी कामाची गती वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. पुढील सहा महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल, अशी खात्री त्यांनी दिली आहे. दरम्यान, या पाहणीच्या वेळी त्यांच्यासोबत जवाहरलाल नेहरू 'पोर्ट ट्रस्ट'चे सहाय्यक प्रबंधक राजीव जोशी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. जालन्यातून शासनाच्यावतीने उपजिल्हाधिकारी गणेश निराळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ आदींची उपस्थिती होती.