बदनापूर (जालना) - भारतामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची तयारी पूर्ण झाली आहे. आता लवकरच लसीकरणाला देखील सुरुवात केली जाणार आहे. मात्र, लसीकरणाच्या तारखेची घोषणा करण्याआधी सर्व तयारीची चाचपणी, केंद्र सरकारकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून देशभरातील सर्व राज्यांमध्ये 'ड्राय रन' घेतली जात आहे. हे ड्राय रन जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील शेलगाव जिजाऊ शाळेत शनिवारी (दि. 2 जाने.) सकाळी 9 ते 11 या वेळेत घेण्यात आली. यावेळी 25 जणांची तपासणी करण्यात आली आहे.
'ड्रायरन'साठी देण्यात आले प्रशिक्षण
'ड्रायरन'च्या धर्तीवर 1 जानेवारीलाच बदनापूर तालुक्यातील सेलगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकदिवसीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण देण्यात आले. यात स्वयंसेवकांच्या नोंदणीपासून ते प्रत्यक्ष लसीकरण व लाभार्थीस घरी जाण्याची परवानगी देण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर संबंधितांनी कोणती काळजी घ्यायची, याबाबत माहिती देण्यात आली.
ओळखपत्राशिवाय लसीकरण नाही
लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. ओळखपत्र अल्याशिवाय लसीकरण केंद्रात कोणालाही प्रवेश मिळणार नाही. ओळखपत्र तपासल्यानंतर संबंधितांना लसीकरण केंद्रात प्रवेश मिळेल. त्यानंतर लस देण्यात येईल. लस दिल्यानंतर संबंधितांना तत्काळ जाता नाही. त्यांना 30 मिनिटे लसीकरण केंद्रावरच थांबावे लागणार आहे. जर संबंधिताला कोणताही त्रास झाला नाही तर त्यास घरी पाठविण्यात येईल, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळुंके यांनी दिली.
'सीईओं'नी दिली केंद्राला भेट
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी केंद्रावर सकाळी 11 वाजता भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी 25 कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली.
मार्गदर्शक सूचनांचे केले पालन
याबाबत माहिती देताना तालुका अरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळुंके म्हणाले, या ड्राय रनमध्ये प्रत्यक्ष लस टोचण्यात आली नसली तरी लसीकरणासाठी ज्या मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आलेल्या होत्या. त्याचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'केंद्र सरकारने गरिबांसाठीही कोरोनावरील लस मोफत द्यावी'
हेही वाचा - लसीकरणानंतर सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे बंधनकारक आहे का?, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती