जालना - पोलीस आणि समाज यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, यामधील दरी कमी करण्यासाठी, पोलिसांविषयी समाजामध्ये आदर निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशीर असल्याचे वक्तव्य औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी केले. तसेच समाजाला अपेक्षित असलेली पोलीस यंत्रणा येत असल्याचेही ते म्हणाले.
कालपासून (शुक्रवार) जालना जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांची तपासणी डॉ. सिंगल यांनी सुरु केली. त्या पार्श्वभूमीवर जालन्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात ते बोलत होते. आजही पोलीस समाज पोलीस ठाण्यापासून दूर आहे. कारण समाजाला पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक मिळत नाही, तक्रारदाराला पाहिजे ती माहिती मिळत नाही, योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे समाज आणि पोलीस यांच्यातील दरी वाढलेली आहे. ही दरी आता कमी होण्याचे संकेत मिळत असल्याचे ते म्हणाले. कारण आत्तापर्यंत पोलीस प्रशासनामध्ये दहावी-बारावी शिकलेल्यांची भरती व्हायची आणि यातूनच उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नतीवर अधिकारी जायचे. मात्र, बदलत्या काळामध्ये हे उच्चशिक्षित तरुण या व्यवस्थेकडे वळत आहेत. त्यामुळे त्यांची विचारसरणी त्यांचे राहणीमान आणि एकंदरीत त्यांच्या प्रती असलेल्या भावना ह्या बदललेल्या असल्याचे सिंघल म्हणाले.
दरम्यान, पोलीस प्रशासनाच्या असलेल्या विविध अडचणींबाबत जिथे निधीची आवश्यकता आहे असे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जालना शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये शौचालयाचा अभाव आहे. याबाबत डॉक्टर सिंघल यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. याबाबत त्यांनी तत्काळ सुविधा सुरू करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.