जालना - परतूर तालुक्यातील श्रीष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या प्रकाराची जालना शहरातही पुनरावृत्ती झाली आहे. शहरातील एका महिलेला दोन वेगवेगळ्या लसीचे डोस देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जालना शहरातील रहिवासी असलेल्या रंजना अशोक निक्कम यांना कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्यात आले आहेत. या प्रकरणाची आरोग्य विभाग चौकशी करणार आहे.
हेही वाचा - आरबीआय केंद्र सरकारला देणार १ लाख कोटी रुपये, जाणून घ्या सविस्तर
एकाच महिलेला दोन वेगवेगळ्या कंपनीचे डोस
जालना शहरातील रहिवासी असलेल्या रंजना अशोक निक्कम (49) यांनी 16 मार्च रोजी जालना शहरातील आस्था हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी त्यांना जवळपास 50 दिवस लागले आहेत. 6 मे रोजी रंजना निक्कम यांनी जालना शहरातील शांतीनिकेतन विद्या मंदिर या शाळेत लसीचा दुसरा डोस घेतला. मात्र, हा डोस घेताना गोंधळ उडाला. त्यांना पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतला असताना दुसरा डोस मात्र त्यांना कोव्हिशिलडचा देण्यात आला आहे.
आधी श्रीष्टीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला होता प्रकार
श्रीष्टीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एका पुरुष लाभार्थ्यांला दोन वेगवेगळ्या लसीचे डोस देण्यात आल्यामुळे उडालेल्या गोंधळाची चोकशी पूर्ण झाली. श्रीष्टी येथील प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.आर.सवडे यांनी तीन शिक्षकांवर ठपका ठेवत त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईवरून शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित शिक्षकांवर करण्यात आलेली अन्यायकारक कारवाई मागे घेण्याची मागणी थेट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे करण्यात आली. त्यातच जालना शहरातील हा दुसरा प्रकार समोर आल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य यंत्रणेसमोरच्या अडचणीत भर पडली आहे. आता या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा - स्पूटनिक लशीचे ऑगस्टमध्ये भारतात सुरू होणार उत्पादन
दरम्यान, याप्रकरणी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर यांनी या प्रकरणात संपूर्ण माहिती मागून चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे. जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसातच ही दुसरी घटना घडल्यामुळे लस घेणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.