जालना - कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयातच भरती व्हावे, असे आवाहन या आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक फणींद्र चंद्रा यांनी केले. गुरुवारी त्यांनी जालना जिल्ह्यातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा घेतला.
अपुऱ्या माहितीमुळे गैरसमज -
महात्मा फुले जनआरोग्य योजना ही एक विमा कंपनीसारखे काम करते. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयालाच ही योजना लागू आहे. मात्र, काही रुग्ण हे त्या रुग्णालयात न जाता दुसऱ्या ठिकाणी उपचार घेत आहेत आणि झालेल्या खर्चाचा परतावा मागत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना हा परतावा देणे शक्य नाही आणि त्यामधून गैरसमज वाढत आहेत. तसेच रुग्णालयात भरती झाल्यानंतरही त्या रुग्णाच्या ऑक्सिजनचे प्रमाण तपासूनच त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांनी शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयात उपचार घ्यावेत जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असे आवाहनही चंद्रा यांनी केले आहे.
आगाऊची रक्कम परत मिळणार -
शासनाच्या यादीवर असलेल्या आणि कोरोना बाधित रुग्णाकडून जास्त रक्कम उकळलेल्या हॉस्पिटलची तक्रार महात्मा फुले जन आरोग्य योजना इकडे आल्यानंतर त्याची पूर्ण चौकशी करून अधिकची वसूल केलेली रक्कम रुग्णाला परत देण्यात येईल असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या 54 तक्रारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे आलेल्या आहेत. त्या सर्व प्रकरणाची चौकशी केल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ. सुरेश साबळे यांची नियुक्ती
बालकांसाठी नाही विशेष व्यवस्था -
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये बालकांना धोका असलेला संभाव्य कोरोना आजार पुन्हा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, त्यांच्यासाठी वेगळी कोणतीही योजना नाही. तुर्तास ज्या नियम व अटी कोरोनाबाधित रुग्णाला आहेत. त्याच नियम व अटी या बालकांनादेखील लागू होतील आणि त्यांनादेखील याचा फायदा मिळणार आहे.
मिशन हॉस्पिटलच्या तक्रारी -
जिल्हा सामान्य रुग्णालयात घेतलेला या आढावा बैठकीसोबतच ज्या रुग्णांनी तक्रारी केल्या होत्या या तक्रारीची सुनावणी देखील विभागीय व्यवस्थापक फणींद्र चंद्रा यांनी केली. विशेष करून जालना येथे सुरू असलेल्या मिशन हॉस्पिटल संदर्भात जास्त तक्रारी होत्या. त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. काही तक्रारीसंदर्भात चौकशी करत आहोत, अशी माहितीही चंद्रा यांनी दिली. यावेळी समूह व्यवस्थापक शरद पवार, जिल्हा समन्वयक डॉ. अविनाश मिरकड, प्रकल्प प्रमुख किशोर चेपटे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन नानोटे यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - माझ्या भाषेत सांगायचे तर हे छा-छु काम आहे, अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना सुनावले