भोकरदन (जालना) - जिल्ह्यातील भोकरदन येथील नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष यांच्यामध्ये विकास कामावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. माजी नगराध्यक्ष शेख नजीर शेख इलियास यांनी शहरात होत असलेल्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच याची चौकशी करण्यात यावी, नाहीतर उपोषण बसू, असा इशारा देखील त्यांनी दिला. यासंदर्भातील एक निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर केले.
केळणा नदीच्या काठावर एका कॉप्लेक्सचे काम सुरू आहे. त्यासाठी परवानगी घेतली नाही. तसेच मंगलकार्यालयाचे काम करताना देखील पर्यावरण खात्याची परवानगी घेतली नाही. त्यामध्ये वाळू, रेती न वापरता भूसा वापरून बोगस काम केले जात आहे, असा आरोप इलियास यांनी केला. तसेच याबाबत मुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री यांना भेटून निवेदन दिले. तसेच चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, माजी नगराध्यक्षांनी लावलेले हे आरोप बिनबुडाचे आहेत. यामध्ये कोणतेही निकृष्ट दर्जाचे काम होत नसून चांगल्या प्रकारे काम करण्यात येत आहे. आम्ही त्या कामाकडे जातीने लक्ष देवून काम करून घेत आहोत. आतापर्यंत कोणतेही शहरात चांगली कामे झाली नाही. मात्र, आम्ही चांगल्या प्रकारे काम करीत असल्याचे उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी यांनी सांगितले.