जालना - नगरपालिका सध्या नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा एक प्रकार पाहायला मिळत आहे. शहरांमध्ये पाणी मिळेना म्हणून तर औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्यामुळे (विद्युत प्रवाहयुक्त शक्यता) जीव जाण्याची वेळ आली आहे. औद्योगिक वसाहत परिसरात फुटलेल्या जलवाहिनीमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी जलवाहिनी फुटली असून त्या पाण्यामध्ये अपघाताने विद्यूत प्रवाह उतरू शकतो. त्याकडे पालिकेची दुर्लक्ष करत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जालना येथील उप अभियंत्यांनी जालना नगरपालिकेला २५ मे २०२६ ला पत्र देखील लिहिलेले आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या पत्राला केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे पाण्यासाठी शहरातील नागरिकांची भंटकती सुरु आहे. तर दुसरीकडे पाण्याची जीवघेणी गळती होताना दिसून येत आहे. शिवाय पाणीही वाया जात आहे.
अशा धोकादायक परिस्थितीत ती जलवाहिनी दुरूस्त करण्याऐवजी त्या उंच उडणाऱ्या फवाऱ्यांवर एक मोठा दगड ठेवण्यात आला आहे. तरीदेखील पाण्याचा दाब कमी झाला नाही. शिवाय या गळतीमधून रोज लाखो लिटर वाया जाणारे पाणी बाजूलाच असलेल्या औद्योगिक वसाहतीतील विहिरीमध्ये जात आहे. त्यामुळे या विहिरीमध्ये कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे .हा पाणीसाठा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या जलकुंभात उपसा करून तो या वसाहतीमध्ये पुरविला जातो. मात्र,अशा प्रकारे विहिरीमध्ये पाणी का सोडले जात आहे? जलवाहिनी दुरुस्त का केली जात नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शहराला २० दिवसांनी पाणीपुरवठा-
याउलट परिस्थिती शहरांमध्ये आहे. शहरात सध्या 20 ते 22 दिवसांआड पाणी येत आहे. हंडाभर पाण्यासाठी शहरवासीय भटकंती करीत असतानाच पाण्यासाठी जीव जाण्याची वेळ आली आहे. तर एमआयडीसीमधील फुटलेल्या जलवाहिनीमुळे पाण्याच्या माध्यमातून वीज प्रवाह उतरून याठिकाणी पाणी भरणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.
फुटलेल्या जलवाहिनी संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 25 मे 2016 ला नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन ही गळती बंद करण्यासाठी विनंती केली होती. तसेच याबाबत जिल्हाधिकारी यांनी देखील दूरध्वनीद्वारे औद्योगिक विकास महामंडळाला कळविले असल्याचाही यामध्ये उल्लेख आहे. मात्र जालना नगरपालिकेवर याचा काहीच परिणाम झाला नाही.
औद्योगिक वसाहतीला स्वतंत्र पाणीपुरवठा-
जालना येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी शेंद्रा एमआयडीसीमधून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे जालना नगरपालिकेचा पाणीपुरवठा आणि औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे या पाण्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. मात्र, सदरील पाणी आमच्या विहिरीत पडत असल्यामुळे त्या पाण्याचा आम्ही उपसा करतो. परंतु हे पाणी बंद करण्यासाठी आम्ही पत्र देऊनही ही जालना नगरपालिका ते बंद करीत नाही, त्यात आमचा काय दोष? अशी प्रतिक्रियाही या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.