बदनापूर (जालना)- मृग नक्षत्र सुरू झाले की शेतकरी पेरणीची लगबग सुरू करतो. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. गतवर्षी तालुक्यातील ७ पैकी ४ भागात अतिवृष्टी झाली होती. त्या भीतीतून यंदा शेतकऱ्यांनी कृषी विभागाने १०० मि.ली. पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत, मान्सूनपूर्व पडलेल्या पावसाच्या भरोशावर कापूस पेरणी केली. चार दिवसापासून पावसाने दडी दिल्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. मागील चार दिवसापासून सोसाट्याचा वारा व प्रखर ऊन पडत असल्याने पावसाचे वातावरणच नाहीसे झाले आहे.
गतवर्षी अतिवृष्टीने खरीपाचे झाले होते नुकसान
गतवर्ष वगळता मागील पाच वर्षापासून बदनापूर तालुक्यात अल्प पाऊस झाला आहे. गतवर्षी मात्र मृग नक्षत्रापासूनच जोरदार पाऊस झाला होता. बदनापूर तालुक्यातील चार विभागात अतिवृष्टी होऊन जमिनी खंगाळून निघालेल्या होत्या. त्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. ते संकट यंदाही ओढवू नये यासाठी खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी किमान १०० मीली पाऊस पडेपर्यंत व १४ जूनपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला होता.
पाऊस नसल्याने तुषार संचाने सुरू केले सिंचन
मागील वर्षी उशिरा पेरणी केल्यामुळे पिके आली नसल्याची धारणा शेतकऱ्यांमध्ये होती. तसेच पाऊस येणारच अशी अपेक्षाही हवामान खात्याच्या व इतर मान्सूनविषयक अभ्यासकांनी व्यक्त केली, असल्यामुळे तालुक्यातील ४,५ व ७ जून रोजी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी सुखावला होता. कित्येक शेतकऱ्यांनी गडबड करत कापसाची लागवड करून टाकली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली असून, कापूस लावल्यानंतर पाऊस न पडल्याने बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यांनी ठिबक किंवा तुषार संचाद्वारे सिंचन करण्यास सुरुवात केली आहे.
दुबार पेरणीचे संकट
शेतकऱ्यांनी दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे व मृगात पिके लावल्यानंतर पिके चांगले येतात. या आशेपोटी ७ जूनपूर्वी मान्सूनपूर्व पाऊस पडताच खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे व खत खरेदीसाठी बाजारात गर्दी सुरू केली होती. त्यापैकी २५ टक्के शेतकऱ्यांनी कापूस लागवडही अल्पशा झालेल्या पावसाच्या जोरावर केली. मात्र आता मागील ३ ते ४ दिवसांपासून पावसाने उघडीक दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येत असल्याचे चित्र दिसत आहे.
कापूस व सोयाबीन पेरणीकडे कल
सुरुवातीला पाऊस कमी झाल्यास कपाशीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. तुरीचे पीक जिल्ह्यात हमखास होतेच, अशी स्थिती असल्याने अंतरपिकासाठी तुरीला सर्वाधिक पसंती आहे. तसेच सोयाबीन पिकावर देखील शेतकऱ्यांचा भर आहे. मात्र मान्सून सुरु होण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी कापूस लावल्यामुळे ते बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वर्षी कापूस व सोयाबिन पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. मक्याचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता दिसून येत आहे. मूग, बाजरी, उडिद या पारंपारिक पिकांचीही पाऊस वेळेवर न आल्यास पेरणी होऊ शकणार नाही.
100 मिली पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याचे आवाहन
मागील वर्षी दुबार पेरणीचे संकट आल्याने यंदा १०० मीली पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. असे आवाहन बदनापूर तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी केले होते. त्याकडे दुर्लक्ष करत तालुक्यातील २५ टक्के शेतकऱ्यांनी यंदा चांगला पाऊस राहील व कपाशीचे उत्पन्न चांगले हाती येईल. या अपेक्षेने कापूस पिकाची लागवड केली. मात्र ७ जूननंतर पावसाने दगा दिल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला असून, पुन्हा पेरणी करावी लागते की काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
तीन एकर सरकी लावली
या बाबत बदनापूर येथील तरुण शेतकरी मनोहर गजर यांनी सांगितले की, मागील आठवडयात खूप ढगाळ वातावरण होते. तसेच सुरुवातीला पाऊसही चांगला पडल्यामुळे आम्ही ३ एकर सरकी (कापूस) लावला, मात्र त्यानंतर पाऊस आलाच नाही. आता दोन दिवसात जर पाऊस आला नाही, तर हे सर्व बियाणे व खत वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील चार दिवसापासून फक्त सोसाट्याचा वारा सुटला असल्याने, ढग नाहीसे होऊन उन्हाचा तडाखा वाढला आहे.
हेही वाचा- शेतकऱ्यांनो! १७ जूनपर्यंत पेरण्या टाळा; कृषी विभागाचे आवाहन