मुंबई - राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली तरी युतीचा ओलावा सामान्य कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये झिरपला नसल्याचे दिसून येत आहे. जालना मतदार संघातून लोकसभा लढवून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना असमान दाखवणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते मंत्री अर्जुन खोतकर यांनी केल्याने युतीत वाद निर्माण झाला आहे. भाजप नेत्यांनी खोतकर यांची समजूत घातली असली तरी अद्याप वाद मिटला नसून आता रावसाहेब दानवे थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. खोतकर-दानवे यांच्या वादामुळे युतीतल्या नेत्यांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे.
दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जालन्यात जाऊन खोतकर यांची भेट घेतली होती. देशमुख यांनी सर्वकाही अलबेल असल्याचे सांगितले. मात्र, खोतकर यांनी या वादात मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर काल खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही ही खोतकर समाधानी नसल्याचे सांगण्यात येत आहे. आता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात खोतकर आणि दानवे यांनी अद्याप जाहीररीत्या मतप्रदर्शन केले नाही. मात्र, येत्या दोन दिवसात खोतकर आणि दानवे वादावर पडदा पडेल, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.
युती झाली तरी दानवे यांच्या विरोधात जालन्यातून लोकसभा लढवणार असल्याचे खोतकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याने भाजपने या भूमिकेचा धसका घेतला आहे. युतीत असताना शिवसेनेच्या नेत्याने हे आक्रमक पाऊल उचलले तर त्याचा राज्यात विपरीत परिणाम होऊन भाजपला शिवसेनेची मदत मिळणार नाही, असे भाजप नेत्यांना वाटत आहे.