जालना - कोरोना विषाणू फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमध्ये आता शुकशुकाट जाणवत आहे. ग्रामीण जनताच शासकीय कार्यालयात येत नसल्याने बाराही महिने गजबजलेल्या या कार्यालयांना आता सुट्टीच्या दिवसांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कार्यालयांबाहेर पेट्या ठेवल्या आहेत. कामासाठी येणारे लोक आपले काम लिहून चिठ्ठी या पेट्यांमध्ये टाकत आहेत.
जालना पंचायत समिती ही तालुक्याच्या आणि विशेषतः ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू. इथे नेहमीच वर्दळ असते. मात्र, जिल्हाधिकार्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेल्या सूचनेनुसार इथे कार्यालयाच्या बाहेर पेटी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गरजू कार्यालयाकडे येतच नाहीत. काही जण आले तरी आपले काम लिहून पेटीमध्ये चिठ्ठी टाकून जात आहेत. दिवसभर या पेटीमध्ये जमा झालेल्या तक्रारी आणि सूचना यांचा संध्याकाळी कार्यालय बंद होण्यापूर्वी संबंधित विभागाकडे पोहोचवल्या जात आहेत.
गटविकास अधिकारी एस. आर. कुलकर्णी यांनी कर्मचाऱ्यांचीही काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष समोरासमोर न बोलता टप्प्याटप्प्याने बोलण्यासाठी आणि कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी इथे अभ्यागतासाठी एक विशेष कक्ष उघडला आहे. मात्र येणारे अभ्यागतच राहिले नसल्यामुळे हा कक्षही ओस पडलेला आहे. कधी काळी शासकीय कार्यालयांच्या बाहेर जशा पोस्टाच्या टपालपेट्या दिसत होत्या, तशी पेटी पंचायत समिती कार्यालयाबाहेर पहायला मिळत आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद
हेही वाचा - #CORONA : मशीद बंद ! कॅम्प भागातील इराणी इमाम वाडा मशीद ट्रस्टचा निर्णय