जालना - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने आता चित्ररथ आणि लोकगीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. जालना जिल्ह्यात मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
दहा दिवस फिरणार चित्ररथ
जालना जिल्ह्यात दिनांक 16 ते 25 फेब्रुवारी दरम्यान हा चित्ररथ फिरणार आहे. चित्ररथाच्या एका बाजूला एलईडी डिस्प्लेच्या माध्यमातून विविध जनजागृतीपर मार्गदर्शन, तर दुसऱ्या बाजूने शाहीर नानाभाऊ परिहार आणि संच यांच्या कोरोनावर असलेल्या लोकगीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी ही माहिती दिली. दरम्यान जालना शहरात दोन दिवस फिरल्यानंतर उर्वरित आठ दिवस हा चित्ररथ ग्रामीण भागात फिरणार आहे. उद्घाटनाच्या वेळी औरंगाबाद येथील अधिकारी संतोष देशमुख, प्रदीप पवार, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी महेंद्र वाघमारे यांची उपस्थिती होती.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा उपक्रम
महाराष्ट्र व गोवा प्रदेश यांच्या वतीने आत्मनिर्भर भारत covid-19 लसीकरण जनजागृतीपर महाराष्ट्रात 16 चित्ररथ फिरणार आहेत. पुणे येथील भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो कार्यालयाचे यावर नियंत्रण आहे. या सोळा चित्ररथांपैकी जालना येथे दाखल झालेला हा एक चित्ररथ आहे.
कोरोनावर लोकगीत
शाहीर नानाभाऊ परिहार आणि संच यांच्यावतीने या लोकगीताच्या माध्यमातून जनतेने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, याविषयी जनजागृती करणाऱ्या लोकगीतांची रचना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून सुरेखा पगारे, भगवान ढवळे ,जनार्धन पैठणे, बाबाराव लाखे, भीमराव तुपे हे या लोकगीतांचे सादरीकरण करत आहेत.
हेही वाचा - कोरोनाची दुसरी लाट? मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू