जालना - जिल्ह्यातील भोकरदन शहरातील काझी मोहल्ला येथील 53 वर्षीय व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे शहरातील मध्यवस्तीचा हा भाग मुख्याधिकारी अमित कुमार सोंडगे यांनी सील केला. दरम्यान, कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्ती ही गेल्या काही दिवसांपासून न्युनोनिया आजाराने ग्रासलेली होती. त्यामुळे सिल्लोड येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार न करता औरंगाबाद येथे जाण्यास सांगितले होते.
औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यानंतर आज (शनिवार) सकाळी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामुळे भोकरदन शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा... चारित्र्याच्या संशयावरून सासरच्यांनी केले महिलेचे मुंडन; कोल्हापूरातील तेरवाडमधील घटना
दरम्यान, सदर व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने संबधित व्यक्ती राहत असलेला काझी मोहल्ला परिसर सील करण्यात आला. ही व्यक्ती काही महिन्यापासुन किडनीच्या आजाराने त्रस्त होती. तसेच मागील काही दिवसांपासून त्यांना न्युमोनिया झाला असल्याने श्वसनाचा त्रास जाणवत होता. या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या जवळपासच्या सात नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांचेही स्वॅबचे नमुने घेण्यात येणार आहेत. काझी मोहल्ला भागातील जवळपास 68 घरे सील करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी अमित कुमार सोंडगे यांनी दिली.
खुशी रुग्णालय सील...
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या व्यक्तीने प्रथम भोकरदन शहरातील खुशी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यामुळे हे रुग्णालय देखील सील करण्यात आले आहे.
काझी मोहल्ल्यात प्रमुख अधिकारी दाखल...
भोकरदन शहरात कोरोनाचा रुग्ण मिळाल्याची माहिती औरंगाबाद येथील रुग्णालयातून मिळताच तहसीलदार संतोष गोरड, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी तात्काळ काझी मोहल्ल्यात जाऊन पाहणी केली आणि परिसर सील करण्याचा निर्णय घेतला.