जालना: आधीच्या सरकारने दुर्दैवाने जलयुक्त शिवार योजना बंद केली. ती आम्ही सुरू केली. त्याचबरोबर बंद पडलेली मराठवाडा वाॅटरग्रीड योजना पुन्हा सुरू केली जाईल असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून चांगले काम झाले असून यासाठी गुरुजींचे कौतुक करायला हवे असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. जलतारा प्रकल्प यापुढे राबवण्यासाठी राज्य सरकार आवश्यक सर्व मदत करेल. सरकार कुठेही कमी पडणार नाही, असे सांगत जलतारा प्रकल्पाचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश केला जाईल, असे आश्वासन देखील शिंदे यांनी दिले. राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सर्व लोकहिताचे निर्णय घेतले जात आहेत.
शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय : यापुढेही शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील. आमच्या सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले आहे. यापुढेही शेतकरी जे म्हणतील तेच निर्णय घेतले जातील असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी धर्म सोडून राजकारण केले तर ते जास्त दिवस टीकत नाही, असे श्री श्री रविशंकर यांनी म्हटले आहे.
दावोस करारासाठी गुरुजींचा आशीर्वाद : आम्ही उद्योगांच्या वाढीसाठी दावोसमध्ये करार केले आहे. त्यावेळी श्री श्री रविशंकर यांनी आम्हाला तिथे भेटून देखील आशीर्वाद दिले, याचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला. यापुढे देखील उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असून उद्योगासाठी आवश्यक सर्व सुविधा दिल्या जातील असे आश्वासन शिंदे यांनी उपस्थितांना दिले.
भाजप आणि शिंदे गटांमध्ये धाकधूक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटला मोठा फटका बसेल, असे सी व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. भाजप आणि शिंदे गटांमध्ये धाकधूक वाढले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबईत आज शिंदे गटाच्या आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. दरम्यान, गाव तिथे शाखा, शाखा तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
यामुळे आमदारांमध्ये नाराजी : शिवसेनेतील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या दालनात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. अशातच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यांच्या मनधरणीसाठी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचे संगण्यात आले होते. त्यानुसार, आमदार मंत्री दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज ही बैठक झाली. बैठकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेची आगामी रणनीती ठरवण्यावर चर्चा करण्यात आल्याचे आमदार मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.
५०० दवाखाने सुरू करणार : मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हाप्रमुख, आमदार, खासदार, संपर्क प्रमुखांची अंगीकृत संघटनांची आज बैठक पार पडली. बैठकीत जिल्हा, तालुका स्तरावर कार्यालय सुरू करावे. गाव तेथे शाखा, शाखा तिथे शिवसैनिक ही संकल्पना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे दर आठवड्याला मंत्र्यांनी जनता दरबार घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, येत्या (दि. 9 फेब्रुवारी)रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे ग्रामीण भागात या दिवशी ५०० दवाखाने सुरू करणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.